सोशल मीडिया संमेलन काळाची गरज- विनोद तावडे

0
752

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  ‘सोशल मीडियावर केवळ जोक आणि ‘फॉरवर्ड मेसेजेस’ येतात असे नाही तर साहित्यिक खोली असणाऱ्या अनेक दर्जेदार गोष्टी येत असतात. हे साहित्य एकत्रित आणण्यासाठी सोशल मीडिया संमेलन भरवणे ही काळाची गरज आहे,’ असे मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होत असलेल्या पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचं उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. सोशल मीडियाला साजेशा पद्धतीनं या संमेलनाचं ऑनस्क्रीन दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तावडे यांनी सोशल मीडियाबद्दल त्यांचे विचार मांडले. ‘अधिकाधिक लोकांना मराठी भाषेशी जोडायचं असेल तर भाषेला कुठल्याही एका चौकटीत बांधून उपयोग नाही. सोशल मीडियावरही मराठीचा वापर वाढला पाहिजे. तिथं मराठीला प्रोत्साहन दिले नाही तर मराठी तरुण पिढी आपल्या भाषेपासून तुटेल. याउलट सोशल मीडियावर वेगवेगळ्या संकल्पना तरुणांना कळल्या तर छापील स्रोतांकडे त्यांचा नवा प्रवास सुरू होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावरील साहित्यिक आणि प्रचलित साहित्यिक यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न झाल्यास सरकार अशा उपक्रमाला पाठिंबा देईल,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘सोशल मीडियावर मराठी भाषेला प्रोत्साहन देणे, मराठीचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आणि सोशल मीडियावरील साहित्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे संमेलन भरवण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात अनेक चर्चासत्रे होणार असून सोशल मीडियाच्या सुयोग्य वापराबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, सोशल मीडियामुळं निर्माण होणाऱ्या नव्या वाटांविषयी चर्चा होणार आहे.