Maharashtra

सोशल मीडियात भाजप समर्थक विरुध्द विरोधक पेटले

By PCB Author

May 22, 2020

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – राजकारणाचे रणांगण आता सोशल मीडिया झाले आहे. राज्यात राजकारणाचे पडसाद थेट ट्विटरवर उमटताना दिसत आहेत. ट्विटरवरही भाजपा समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक आमने सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावरुनच आता ट्विटवर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये हॅशटॅग युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांनी #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटग वापरुन संकटाच्या काळात भाजपा राजकारण करुन राज्याच्या हिताविरोधात पाऊल उचलत असल्याचा टोला लगावला आहे. तर भाजपाच्या समर्थकांनी #MaharashtraBachao हा हॅशटॅग वापरुन राज्यातील करोनासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यासंदर्भात टीका करत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी (२२ मे २०२०) दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत #महाराष्ट्रद्रोहीBJP या हॅशटॅगवर ८२ हजार तर #MaharashtraBachao हॅशटॅग वापरुन ४० हजार जाणांनी आपली मत ट्विटरवर व्यक्त केल्याचे ट्विटवरील ट्रेण्डींग टॉपिकमधून स्पष्ट होतं आहे.

दरम्यान, समर्थक आणि विरोधक अशी ही लढाई पेटलेली दिसत आहे. त्यात काही अंशी सर्व पक्षांच्या सोशल मीडिया सेलचाही वाटा दिसतो. प्रत्येक पक्षाने आपल्यावर हल्ला झालाच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियाची टीम केली आहे. त्यांच्याकडून हे आरोप- प्रत्यारोप खोडणे अथवा त्यात भर घालण्याचे काम चालते, असे एका जाणकाराने सांगितले.