सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी करू नका – पंतप्रधान मोदी

0
819

वाराणसी, दि. २९ (पीसीबी) – प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी तसेच द्वेष पसरवण्यासाठी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, सोशल मीडियाचा वापर आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) येथे केले. सोशल मीडियाचा गैरवापर करणे, हे एका चांगल्या समाजासाठी अत्यंत चुकीचे आहे, असेही मोदी म्हणाले.  

वाराणसीमधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, अनेकदा लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलंडतात. काही चुकीचे ऐकतात, पाहतात आणि तेच फॉरवर्ड करतात. समाजासाठी हे किती धोकायदाक आहे याचा ते विचारच करत नाहीत. काही लोक समाजाला शोभणार नाहीत, अशा शब्दांचा वापर करतात. महिलांबद्दल ते काहीही आक्षेपार्ह लिहितात’,  हे चुकीचे असल्याचे मोदींनी म्हटले.

हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा विचारसरणीचा मुद्दा नसून १२५ कोटी भारतीयांचा प्रश्न आहे. त्यामुळे  प्रत्येकाने सोशल मीडियावर आपण द्वेष पसरवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.