Pune

सोशल मिडियावर गांधी कुटुंबीयांना मारण्याची धमकी; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By PCB Author

February 12, 2019

पुणे, दि. १२ (पीसीबी) – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशीच अलिगड येथील हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मक गोळ्या झाडून तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता. या घटनेच्या निषेध व्यक्त करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सोशल मिडीयाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टवर नीती गोखले नामक महिलेने कमेंट करत गांधी कुटूंबियांना थेट मारण्याचीच धमकी दिली आहे.

याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसच्यावतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, नीती गोखले नामक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी ३० जानेवारी रोजी अलिगड येथे हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडून नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. या घटनेचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला होता. या घटनेच्या निषेध व्यक्त करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सोशल मिडीयाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी आपल्या वॉलवर ३० जानेवारी रोजी बापू हम शर्मिंदा हैं….तेरे कातिल अभी भी जिंदा हैं अशी पोस्ट टाकली होती. या पोस्टवर नीती गोखले नामक महिलेने कमेंट करत अजून दोन गांधी आहेत. त्यांचा वध करायला एक नथुराम गोडसे हवे अशी कमेंट केली आहे. या महिलेच्या विरोधात शहर काँग्रेसकडून आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.