Maharashtra

सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात नितीन गडकरींना पुन्हा भोवळ

By PCB Author

August 01, 2019

सोलापूर, दि. १ (पीसीबी) –  सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत सुरु असताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आज (गुरूवार)  भोवळ आली. राष्ट्रगीत सुरु असताना गडकरी अचानक खाली बसले आणि पुन्हा त्यांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मंचावर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते. लगेचच गडकरींना पाणी आणि औषध देण्यात आली. सध्या नितीन गडकरींची प्रकृती स्थीर असून आता ते पुढील कार्यक्रमासाठी रवानाही झाले आहेत.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात अहमदनगरच्या राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात  गडकरी यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीत सुरु असताना त्यांना अचानक चक्कर आली होती. त्यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरी यांना सावरले होते.

त्यानंतर लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिर्डीतील सभेत नितीन गडकरी यांना चक्कर आली होती. उष्णतेचा त्रास त्यावेळी गडकरी यांना झाला होता आणि ते अचानक खाली बसले होते.