सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाचा नियोजित प्रयोग रद्द!

460

सोलापूर, दि. २२ (पीसीबी) – लाकूड, टायर आणि मीठ जाळून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग रद्द करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील तब्बल १०२४ गावांमध्ये हा प्रयोग होणार होता.

लाकूड, टायर आणि मीठ जाळून दुपारी चार वाजता प्रयोग करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पर्यावरणप्रेमींनी अशा प्रकारचा प्रयोग पर्यावरणास हानीकारक आणि अशास्त्रीय असल्याचा आरोप केला. सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून केवळ ४० टक्के पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही थांबल्या आहेत. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने बळीराजाही हतबल झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेत मद्रास आयआयटीचे शास्त्रज्ञ श्रीहरी मराठे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता.

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक खड्डा घेऊन त्यात वड, पिंपळ, उंबर अशा झाडांची २०० किलो लाकडं घालण्यात येणार होती. त्यावर ५० किलो खडे मीठ टाकून संध्याकाळी चार वाजता जाळण्यात येणार होतं. त्यामुळे तयार झालेला धूर आकाशात जाईल आणि सिल्व्हर आयोडाइडच्या प्रक्रियेमुळे पाऊस पडेल, असा दावा करण्यात आला होता. पण यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.