सोलापूरात दरोडेखोर आणि पोलिसांत थरारक चकमक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक जखमी; एक दरोडेखोर ठार

0
2266

सोलापूर, दि. १० (पीसीबी) – रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या सोलापूर पोलिसांची दरोडेखोरांसोबत थरारक चकमक झाली. या चकमकीत  दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. तर बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) पहाटेच्या सुमारास सोलापूरजवळील उळेगाव परिसरात घडली.

विजय पाटील असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तर मयत दरोडेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास सोलापूर शहराजवळील उळे गावाजवळ पोलिस गस्त घालत होते. पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर एका दरोडेखोरला पकडण्यात आले. त्याला वाहनात बसवत असताना ‘साहेब चुकले चुकले म्हणत’ दरोडेखोराने हातातील तलवारीने तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये पोलिस निरिक्षक पाटील हे गंभीर जखमी झाले. बचावाच्या उद्देशाने पोलिस निरिक्षक पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला. दरोडेखोर गोळीबारामध्ये जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. सोलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.