Maharashtra

सोलापूरात एमआयएम नगरसेवका विरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या महिलेचा खून

By PCB Author

May 17, 2019

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना विजयपूरमध्ये घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तौफिक शेख यांच्याविरोधात रेश्मा पडेकनूर यांनी बुधवार १७ एप्रिल रोजी विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर आणि एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरु होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रेश्मा यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या बेपत्ता झाल्या. विजयपूरजवळ असलेल्या कोलार गावात काल संध्याकाळी सात वाजता रेश्मा यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विजयपूरमध्ये शवविच्छेदनसाठी आणण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेश्मा यांची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तौफिक शेख यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या वादाचा हत्येशी काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.