सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरून वळसे पाटलांची झाली उचलबांगडी

0
508

 

सोलापूर, दि.१( पीसीबी) – राज्यात कोरोना व्हायरसचे प्रस्थ वाढत असताना आणि सोलापुरात जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली असताना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. उलट जिल्हा प्रशासन रस्त्यावर उतरून कामकरत असताना प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना स्वत:च्या व्ही.सी.मध्ये तासन्तास अडकावून ठेवून त्यांच्या आणीबाणीच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम वळसे-पाटील यांनी केले होते.

पालकमंत्र्यांच्या विरोधात सोलापुरात तीव्र नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर वळसे-पाटलांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कोरोनामुळे भयभीत असताना प्रत्येकाच्या मनात पालकमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न होता. मदतीसाठी प्रशासन रस्त्यावर असताना पालकमंत्र्याविना जिल्हा वार्यावर गेला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलीप वळसे-पाटलांकडे आल्यानंतर त्यांनी केवळ दोनवेळाच जिल्हा दौरा केला होता, तोही शासकीय सुटीदिवशी. त्यामुळे सरकारी कर्मचारीही त्यांच्यावर नाराज होते.

त्यानंतर कोरोना साथ आली आणि सोलापूरसह देशात संचारबंदी झाली. त्यावेळी तरी वळसे-पाटील पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यात येऊन प्रशासनाची बैठक घेत सर्वांना कामाला लावतील, असे वाटत होते. मात्र त्यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली होती. अखेर त्याचा फटका त्यांना बसला असून त्यांची पक्षाने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली आहे. आता त्यांच्या जागी मुंब्रा- कळवा येथील आमदार तथा गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची नियुक्ती केली आहे.