सोलापूरच्या उपमहापौराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

0
367

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : एकच फ्लॅट अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर राजेश दिलीप काळे (वय 42) याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे निलख येथील औदुंबर सोसायटीत एक फ्लॅट घेतला होता. हा एकच फ्लॅट बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी अनेकांना विकला. यातून अनेकांची फसवणूक झाली.
याप्रकरणी 2019 मध्ये सांगवी पोलिस ठाण्यात 420, 34 या कलमांतर्गत, तर 2007 मध्ये निगडी पोलिस ठाण्यात 420, 467, 468, 471 या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र पन्हाळे, कॉन्स्टेबल दत्तात्रेय नांगरे, संतोष डामसे यांचे पथक शुक्रवारी (ता. 29) सकाळी सोलापूरला रवाना झाले होते.

आरोपी उपमहापौर राजेश दिलीप काळे याला घेऊन हे पथक रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात रात्री उशिरा काळे यांना अटक करण्यात आली. सांगवी पोलिसांचा तपास झाल्यानंतर आरोपीला निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.