Maharashtra

सोमय्या यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…; शिवसेना आमदाराचा इशारा

By PCB Author

March 13, 2021

मुंबई,दि.१३(पीसीबी) – अलिबागमधील कोर्लाई व मुंबईतील महाकाली येथील जागेबाबत बिनबुडाचे आरोप करून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझी, माझ्या कुटुंबांची व शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे, असे नमूद करत शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी सोमय्या यांना मानहानीची नोटीस धाडली आहे. सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच वायकर यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या नोटिशीत दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांच्यावर जमिनीबाबत आरोप केले होते. अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर व ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या जमिनीवरील बंगल्यांचा वापर व्यवसायासाठी केल्याचा व एका बंगल्याची किंमत ५ कोटी रुपये असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.

या दोन्ही ठिकाणच्या जमिनींबाबतच्या आरोपांचा नोटिशीत उल्लेख करत वायकर यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सोमय्या यांनी कोणतेही सबळ पुरावे न देता आरोप केले आहेत. त्यामुळे माझी, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या पक्षाची नाहक बदनामी झाली आहेच शिवाय जनमानसात असलेली प्रतिमाही मलिन झाली आहे, असे नमूद करत सोमय्या यांनी जाहीर माफी मागावी, अशी समजच या नोटिशीत देण्यात आली आहे. सोमय्या यांनी माफी मागितली नाही तर पुढील सिव्हिल व क्रिमिनल कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटिशीत दिला आहे.