सोन्या-चांदीचे दागिन्यांसह देवघरातील रोकड घेऊन चोरटे पसार

0
232

निगडी, दि. 18 (पीसीबी): कडी कोयंडा तोडून घरात आलेल्या चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि देवघरातील रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना 29 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत कृष्णा सहकारी सोसायटी, सह्याद्री गड, प्राधिकरण निगडी येथे घडली.

अंकुश दत्तात्रय माने (वय 38, रा. कृष्णा सहकारी सोसायटी, सह्याद्रीगड, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 17) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने यांचे घर 29 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि हॉलमध्ये असलेल्या देवघरात ठेवलेली रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.