सोन्याची चकाकी वाढणार; वर्षाअखेरपर्यंत ३८ हजारांचा टप्पा गाठणार

0
576

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – तब्बल २० वर्षांनंतर सोन्याच्या दरांमध्ये जागतिक पातळीवर विक्रमी वाढ झाली आहे. भारतामध्येही सोन्याच्या भावांनी जवळपास ३५,०००चा आकडा गाठला असून जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव येत्या काळात चढते राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदी सुरू केली आहे. याचीच परिणीती जागतिक बाजारेपेठेत सोन्याचे भाव वाढण्यात झाली आहे. अमेरिका- इराण संबंध, तेलाचे पडलेले भाव, डॉलरचे अवमूल्यन अशा अनेक कारणांचाही सोन्याच्या दरवाढीवर परिणाम होतो आहे. २०००नंतर सोन्याच्या भावांमध्ये इतकी विक्रमी दरवाढ पहिल्यांदाच पाहायला मिळते आहे.

सोन्याचे भाव उच्चांक गाठतात तेव्हा मंदीसदृश स्थिती उद्भवण्याचा धोका असतो. शेवटची मंदी येऊन दहा वर्षं निघून गेली. तेव्हा पुन्हा एकदा मंदी येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अनेक गुंतवणूकदार डॉलरमधील गुंतवणूक कमी करत आहेत. जागतिक बाजारपेठेत सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत सोन्याचा भाव ३८,००० चा आकडा गाठू शकतो. एकीकडे सोने महाग होत असताना दुसरीकडे चांदीचे भाव मात्र घसरत आहेत. चांदी सोन्याच्या भावांचे प्रमाण ९३: १ झाले असून १९९२नंतर पहिल्यांदाच इतकी तफावत पाहायला मिळते आहे.