सोनू सूद `रिअल हिरो`

0
572

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांचा दबंग हिरो बनला आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या परप्रांतियांना आपापल्या घरी स्वखर्चाने पोहोचवत आहे. आतापर्यंत त्याने तब्बल 12 हजारांपेक्षा जास्त परप्रांतियांना आपल्या घरी पोहोचवून हजारो कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह देशभरातून सर्वांनीच सोनूचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियातही चर्चा आहे ती त्याच्याच कामाची. यासंदर्भात सोनूने एका वाहिनीशी बातचीत करताना “सध्या माणुसकी कमी झाली आहे. आपण घरी बसलो आहोत आणि ज्यांनी आपली घरं बनवली ते रस्त्यावर आहेत. या लोकांची मला मदत करायची होती,” अशी प्रतिक्रीया दिली.

परप्रांतियांना गावाला पोहोचवण्याची सुरुवात कशी झाली याबाबत सोनू सूदने सांगितले. आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त मजूर आपल्या गावाला पोहोचले असून जास्तीत जास्त लोकांना गावाला पोहोचवणाचा उद्देश असल्याचं सोनू म्हणाला. तसंच वडिलांच्या नावाने सुरु असलेल्या अन्नछत्रात आजही 45 ते 50 हजार लोकांच्या जेवणाची सोय केली जाते. हे काम सुरुच राहणार असल्याचं त्याने सांगितलं.
स्वत:च्या अनुभवावरुन अडकलेल्या परप्रांतियांना आपापल्या गावाला पोहोचवण्याचा विचार मनात आल्याचं सोनूने सांगितलं. तो म्हणाला की, “मी नागपूरला इंजिनिअरिंग केली आहे. तिथे असताना घरी जाण्यासाठी ट्रेनचं आरक्षण होत नसे. त्यामुळे तो अनुभव आहे. पायपीट करणाऱ्या या मजुरांना पोरांबाळांसह पाहिलं, त्यांच्या अडचणी पाहल्या तेव्हा मी पुढे येण्याचा निर्णय घेतला. अनेकांना जेवणाचं वाटप केलं. तिथे कर्नाटकचा 200-250 जणांचा एक ग्रुप होता. त्यांना मी प्रवासासाठी परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं. दोन दिवस सगळ्या परवानगी मिळवली आणि पहिल्यांदा 300 लोक असलेली बस कर्नाटकला रवाना झाली. त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.”

या लोकांना आपापल्या गावात पोहोचवण्यासाठी परवानगी मिळवनं सर्वात कठीण काम होतं, असं सोनू सूद म्हणाला. “सर्वात कठीण काम परवानगी मिळवणं. विविध राज्यातील पोलिसांना वैयक्तिकरित्या फोन करुन परवानगी घेतली. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मजूर जात आहेत, तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांना फोन मजुरांची माहिती दिली जाते. प्रांतियांना त्यांच्या गावाला पोहोचवण्यासाठी घरातील प्रत्येकाची ड्यूटी लागल्याचं सोनूने सांगितलं. तो म्हणाला की, “या कामात माझ्या घरच्यांनी यादी बनवण्यास मदत केली. बायको यूपीला जाणाऱ्या मजुरांची यादी तयार करते. मुलगा नंबरची माहिती घेतो. एक मैत्रिण समन्वयाचं काम करते. सीएची वेगळी ड्यूटी आहे. एक संपूर्ण टीम आहे जी काम करत आहे. या कामाचा व्याप वाढला होता, त्यासाठी टोल फ्री नंबर तयार केला. एका तासात 70 हजार कॉल-मेसेज आले. लांबचा प्रवास असल्याने मजुरांना रस्त्यात उतरावं लागू नये यासाठी दोन दिवसांचं अन्न-पाणी, फळं, यासोबतच मास्क, सॅनिटायझर त्यांना दिलं जातं.
खरंतर सोनू सूद करत असलेल्या कामाची सुरुवातीला कुठेही बातमी झाली नव्हती. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोनूमधला रिअल हिरो सगळ्यांना दिला. हे काम करत असताना कॅमेऱ्याला दूर का ठेवलं, असं विचारलं असता सोनू म्हणाला की, “जे मजूर घरी परतत आहेत, त्यांची मी मनापासून मदत केली. मला पब्लिसिटी करायची नव्हती. मीडियातील अनेक पत्रकारांनी ही बाब कव्हर करण्याची परवानगी मागितली होती. पण तिथे कॅमेरे किंवा फोटोग्राफर असावेत असं मला वाटलं नाही. मजुरांसोबत माझं वैयक्तिक नातं आहे. मी त्यांच्यासोबत बोलतो. म्हणून मला कॅमेरा घेऊन जावं असं कधीच वाटलं नाही.

“कॅमेरा वेगळा गोष्ट आहे आणि कॅमेऱ्यामागचं जग वेगळं आहे. आम्ही लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. पण हेच खरं आयुष्य आहे, सत्य आहे. कॅमेरा प्रत्येक वेळी रोल होऊ शकत नाही. कॅमेरा रोल होतो, त्यावेळी कदाचित अॅक्टिंग सुरु होते. पण कॅमेरा बंद असतो तेव्हा तुम्ही भावनांच्या गोष्टी बोलता. मला हृदयाचं कनेक्शन तोडायचं नाही. या लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे,” असंही त्याने नमूद केलं.

लोक ट्विटरवर मेसेज करुन मदत मागत आहे. त्या प्रत्येकाला सोनू उत्तर देत असल्याचं दिसतंय याबाबत त्याने सांगितलं की, “ज्या दिग्दर्शकांसोबत मी काम केलं, त्यांना माहित आहे की मी चांगले डायलॉग लिहितो. वैयक्तिक नातं बनणं गरजेचं आहे. मी रात्री 3.30 वाजता झोपतो आणि 4.30-5 वाजता उठतो, तेव्हा आधी मोबाईल पाहतो. कोणताही मेसेज सुटू नये, आणि ज्याने मेसेज केलाय त्या जास्त वेळ वाट पाहायला लागू नये. मी मुलाखतीही कमी करतो कारण त्या 20 मिनिटांत मी त्यांना उत्तर देऊन त्यांना घरी पोहोचवू शकेन.