Others

सैन्यदलात जाऊ इच्छिणा-या मुलींसाठी प्रशिक्षण संस्था पुण्याजवळ असावी यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील..

By PCB Author

December 07, 2021

पिंपरी, ७ डिसेंबर -सैन्यदलात जाऊ इच्छिणा-या मुलींसाठी औरंगाबाद येथे शासनाची प्रशिक्षण संस्था आहे. तशीच प्रशिक्षण संस्था नाशिक येथे देखील सुरु करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. अशा प्रकारची एक प्रशिक्षण संस्था पुण्याजवळ असावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सांगितले.

सैनिक भरतीमध्ये एनडीएमध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. तशीच प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीने याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करावा, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. समितीमध्ये जिल्हाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने 15 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेऊन त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. वसतीगृहाची सोय भोजन खर्च, पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचेशी संवाद साधून त्यांना पीटी खेळासाठी मैदानाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच त्यांच्या निवड प्रकियेची व्यवस्था तयार करण्यात यावी. यासाठी समांतर जागेची मागणीच्या माध्यमातून महिलांसाठी 30 जागा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. पार्थ पवार यांनी शासनाच्या या निर्णयाचे ट्विटरच्या माध्यमातून स्वागत केले आहे. तसेच पुण्याजवळ एखादी अशी संस्था सुरु करण्यासाठी शासनाने विचार करण्याची सूचना देखील केली आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सैन्यदलात जाऊ इच्छिणा-या मुलींसाठी नाशिकमध्ये राज्यातील पहिली भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आज महिला देशसेवेसाठी इच्छुक आहेत. आपल्याला अशा अनेक केंद्रांची गरज असून, पुण्याजवळ असे एखादे केंद्र असावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.”