Desh

सैनिकांबाबत आम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिलेले नाही; माजी सैनिकांचा खुलासा  

By PCB Author

April 12, 2019

 नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारतीय सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा आरोप करत याबाबत  नाराजी व्यक्त करणारे माजी सैनिकांच्या सह्यांचे पत्र राष्ट्रपतींना दिल्याचे वृत्त आले होते. आता या पत्रावरून माजी सैनिकांनी युटर्न घेत आम्ही असेही काही पत्र लिहिले नसल्याचा सुर आळवण्यास सुरूवात केली आहे.  

माजी लष्करप्रमुख एस. एफ. रॉड्रिग्ज आणि एअर चीफ मार्शल (निवृत्त) एन.सी. सुरी यांनी या पत्राबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर दुसरीकडे  या पत्रात आपल्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी दिली होती, असे मेजर जनरल (निवृत्त) हर्ष कक्कड यांनी सांगितले. माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही पत्र लिहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या पत्रासाठी माझी परवानगी घेतलेली नाही, तसेच मी असे काही पत्र लिहिलेले नाही, असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एम. एल. नायडू यांनी म्हटले आहे. अॅडमिरल (निवृत्त) रामदास यांनीही या पत्रासाठी माझी परवानगी घेतलेली नाही, असे सांगितले. तर आमचे मत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे एअर चीफ मार्शल (निवृत्त) एन. सी. सुरी यांनी म्हटले आहे.