Banner News

‘सेवा’ विकास बँकेचा ‘मेवा’ कोणी कोणी खाल्ला? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

By PCB Author

August 13, 2021

सहकारातून समाजाचा उद्धार व्हावा, या शुध्द हेतुने ३०-३५ वर्षांपूर्वी सिंधी समाजातील सेवाभावी पंच मंडळींनी एक बँक स्थापन केली तिचे नाव `दि सेवा विकास को-ऑप बँक`. पिंपरी चिंचवड शहराच्या अर्थकारणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेल्या पवना, सेवा विकास, जंगली महाराज, इंद्रायणी, अण्णासाहेब मगर, धर्मवीर संभाजी, ज्योतिबा, नंद ऋषी, गणेश सहकारी, गजानन लोकसेवा, छत्रपती अर्बन, प्रेरणा, जयहिंद, हवेली, पिंपरी चिंचवड सहकारी, ज्योतिबा अशा काही जुन्या बँकांचा उल्लेख करावा लागेल. ज्या बँकांच्या चेअरमन, संचालक मंडळी आणि व्यवस्थापक यांनी संगनमताने अंदाधुंदी केली त्या बँका बुडाल्या. कारणे अनेक आहेत, त्यात कुठे अनियमितता तर कुठे गैरव्यवहार आहे. अपहार, अफरातफर, फसवणूक, लबाडी अनेक बँकांमधून पहयला मिळते. अशा उद्योगात ज्या बँका कायमच्या संपल्या त्यात एक एक नाव धक्कादायक आहे. रोखे घोटाळ्यात सुरवातीला जंगली महाराज सारखी सज्जन मंडळींच्या बँकेचा बळी गेला. आज सर्वांच्या चर्चेत असलेली सेवा विकास बँक नादान, छंदीफंदी राजकारण्याच्या गुलछबू वृत्तीने संपली. छत्रपती बँकेच्या चेअरमननेसुध्दा मनमानी केली म्हणून दिवाळे वाजले. धर्मवीर संभाजी सारखी बँकासुध्दा केवळ चेअरमन व संचालकांच्या चुकिच्या निर्णयांमुळे गेली. ज्यांनी चोख, स्वच्छ, रोखठोख व्यवहार केले त्यात पवना, गजानन लोकसेवा, इंद्रायणी सारख्या बँकांचे नाव घ्यावे लागेल. अन्य बँका आजही आर्थिक अडचणीत आहेत. या शहरात दीड हजारावर पतसंस्था, कामगार पतसंस्था होत्या. त्यापैकी ६५ टक्के आज बंद पडल्यात, कारण खोटे व्यवहार. सर्वच बँका, पतसंस्था उभ्या राहिल्या त्या लहान-मोठे उद्योजक, व्यापारी, कामगार, कष्टकरी, मजूरांच्या घामाच्या पैशावर. पण आज सहकारातील चोर, दरोडेखोरांमुळे कष्टाचे चार पैसे बचत करायचे, तर ठेवायचे कुठे याची चिंता जनतेला आहे. कारण विश्वासार्हताच ढासळली आहे. भाईचंद, भुदरगड पतसंस्थांचे दिवाळे निघाले आणि हजारो ठेविदार देशोधडिला लागले. पुणेकरांचे नाक असलेली रुपी को-ऑपरेटिव्ह बँक पाहता पाहता बुडाली आणि लोकांची झोप उडाली. आमदार अनिल भोसले यांच्या वडिलांनी सुरू केलेली बँक त्यांच्या कुकर्तृत्वाने बुडाली. खासगीत सुरू झालेल्या संचयनि, कल्पवृक्ष, संजिवनी अशा काही फायनान्स कंपन्यांनी लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला. वर्षोनवर्षे लोक फसवले जातात, एक रुपया परत मिळत नाही. चोऱ्या करणारे उजळ माथ्याने सुटतात. जे कालपर्यंत झाले तेच आजही होते आहे. तोच तो किस्सा आता पिंपरी चिंचवडच्या नामवंत अशा सेवा विकास बँकेबाबत सुरू आहे. १२४ कर्ज प्रकऱणांची छानबिन केली असता तब्बल ४२९ कोटींचा घोटाळा समोर आला. यात शहरातील राजकीय क्षेत्रात भाई, भाऊ, दादा, काका, मामा असलेल्या अगदी रथीमहारथींची नावे आहेत. आजी-माजी नगरसेवकांची मोठी यादी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रिपाई पासून सगळ्यांच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी सेवा विकासचा मेवा खाल्ला. बिनातारण अथवा खोटे तारण किंवा अतिरिक्त किंमत दाखवून बँकेला फसवले. शहरातील जमीन खरेदी विक्रीमधील बाप माणूस असलेले वकील, दारू धंद्यातून राजकऱणात बाप बनलेले नगरसेवक, शिक्षणाची दुकानदारी कऱणारे, हॉटेल व्यवसायात नाव असलेले असे सव्वाशे ठग, महाठग आहेत. खरे तर, पोलिसांनी सर्वांचीच नावे जाहिर केली पाहिजे किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती कायद्यात ती मिळवून जगजाहीर केली पाहिजेत. समाजसेवेचा बुरखा पांघरून उजळ माथ्याने फिरणारे किती मोठे लुटारू आहेत ते लोकांना कळले पाहिजे. सेवा विकासच्या निमित्ताने अशा बनेल मंडळींना उघडे नागडे करण्याची खरे तर हीच संधी आहे. समाज स्वच्छ करायचा असेल तर हे पूण्य कर्म पोलिसांनी करायला काहीच हरकत नाही. एवीतेवी खोटे तारण अथवा कागद दाखवून बँकेचे कर्ज घेऊन फसविणारे हे गुन्हेगारच आहेत. आगामी काळात पुन्हा पुन्हा असे गुन्हे होऊ नयेत यासाठी सेवा विकास च्या निमित्ताने चोरांचा बंदोबस्त कराच. आताचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हेच ते काम करू शकतात.

अमर मुलचंदानी हा फक्त एक चेहरा…- `सापडला तो चोर आणि बाकी सगळे साव`, असा एक खाक्या आहे. सेवा विकास बँक प्रकरणात चेअरमन म्हणून अमर मुलचंदानी १०१ टक्का दोषी आहे, पण त्याच्या बरोबरचे त्याचे सहकारी तसेच सरकारी भामटेसुध्दा तितकेच जबाबदार आहेत. मुलचंदानी हा एक चेहरा आहे. त्याचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, शाखा प्रमुख, कर्माचारी, कायदेसल्लागार, करसल्लागार हेसुध्दा पापाचे धनी आहेत. बॅंक फेडरेशनसुध्दा दोषी आहे. गेल्या सात-आठ वर्षांतील हा घोटाळा आहे. सहकार खाते, सहकार आयुक्त, सहकारमंत्री, सहकार उपनिबंधक यांना दरवर्षी लेखा परिक्षणातून इत्थंभूत माहिती मिळते, पण त्यांनीही दुर्लक्ष केले. कोणतिही बँक एका दिवसात घाट्यात जात नाही. चुकिचे निर्णय सुरू झाले की एक एक पायरी करून घसरगुंडी सुरू होते आणि कडेलोट होतो. असे निर्णय होऊच नयेत यासाठी सुरवाती पासून प्रयत्न झाले पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आणि घात होतो. सेवा विकास बँकेत ५०० कोटींचा फ्रॉड एका दिवसात झालेला नाही. सगळ्यात गंभीर बाब पोलिसांनी निदर्शनास आणून दिली ती म्हणजे ५१५ कोटींचे रोख रकमेचे व्यवहार झाले आणि त्यात काळा पैसा सफेद करण्याचाच धंदा झाला. कारण त्या पैशाचा उगम व स्त्रोत समजून येत नाही, त्या व्यवहाराची व्याप्ती माहित होत नाही. बेहिशेबी पैसा व्यवहारात आणण्यासाठीच बँकेचा वापर होत होता. पिंपरी बाजारपेठेत रोज शेकड कोटींची उलाढाल होते, कुठेही पक्के बिल मिळत नाही. हवाला व्यवहारात पिंपरी कँप अव्वल स्थानावर आहे. क्रीकेट बेटिंगचे आजवरचे सगळे व्यवहार इथेच होतात. या सगळ्या उलाढालीत सेवा विकास बँक कुठे आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे म्हणजे मोठे बोके सापडतील. सेवा विकास बँकेचा गैरव्यवहार हा अन्य बँकांपेक्षा कितीतरी वेगळा आहे. हा गुंड, माफिया, मवाल्यांचा अड्डा झाला होता काय अशी शंका येते.

१२४ पैकी फक्त ३ प्रकऱणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि बाकीचे काम सुरू आहे, असे पोलिस सांगतात. या बँकेचे ऑडिट आजवर कोणी कोणी केले, सहकार खात्यातील कोणत्या सहनिबंधकांनी तरफदारी केली त्यांचीसुध्दा नावे गुन्हेगारांच्या यादीत घेतली पाहिजे. पहिली चोरी पडकडली त्याचवेळी शासन झाले असते तर दुसरा दरोडा पडला नसता. लाचखोरी करून चोऱ्या लपवल्या म्हणून बँक ५०० कोटींना गाळात गेली. त्यासाठीच चेअरमन, संचालकांच्या बरोबर संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवरसुध्दा टाच आणली पाहिजे. ५०० कोटी वसूल करून ठेविदारांना पैसे या जन्मानत परत मिळतील याची आजतरी शाश्वती देता येत नाही. भुदरगड, भाईचंद पतसंस्था, रुपी बँकेचे ठेविदार उंबरठे झिजूवन स्वर्गवासी झाले, पण एक पैसा परत मिळाला नाही. सेवा विकासचे पैसे आणखी २० वर्षे वाट पाहिली तरी परत मिळतील याची कोणीच खात्री देणार नाही. गुन्हेगार आज ना उद्या सुटतील आणि सर्व इतिहास होईल. अशा किती शोकांतिकांचां अंत झाला. किती बातम्या आल्या आणि हवेत गेल्या. अशा बँका, पतसंस्था बुडवून हे पांढरपेशी चोर, दरोडेखोर, भामटे आजही राजकारणात आजही तसेच आहेत. अनेक ठिकाणी उद्याच्या देशाच्या स्वातंत्र दिनी १५ ऑगस्टला कदाचित त्यांच्या हस्ते ध्वजवंदसुध्दा होईल. सेवा विकास चा मेवा नेमका कोणी कोणी खाल्ला, हा तपास पोलिसांच्या लेखी पुढचे १० वर्षे सुरूच राहिल. २० वर्षांपूर्वी शिवसेना भाजपा युतीची सत्ता राज्यात होती त्यावेळचे सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी अभय दिले होते, नंतर राष्ट्रवादीचे सरकार आले त्यांनीही सर्व गुन्हे पोटात घातले. आता सेवा विकासचा मालक, चालक असलेला अमर मुलचंदानी शिवसेनेत गेले होते, नंतर तो भाजपाच्या कच्छपी लागला. भाजपा काळात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलचंदानी यांच्याकडे उठबस झाल्याचे दिसले. स्थानिक भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे मुलचंदानी हे खंदे समर्थक. भाजपा नेत्यांचे पूर्ण पाठबळ, संरक्षण मुलचंदानी यांना होते. अशा प्रकारे भाजपाच्या छत्रछायेखाली बँकेत सर्व फ्रॉड झाले. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार महाआघाडीच्या सरकारने सेवा विकासचा पंचनामा केला. त्यातून आमदार जगताप यांना आणि भाजपालाही संदेश दिला, असेही राजकऱण असल्याची चर्चा आहे. ५०० कोटींची रोख रक्कम बँकेत ठेवली, काढली जात असेल तर इथे `ईडी` का लक्ष घालत नाही, असाही प्रश्न विचारला पाहिजे. खरे तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी या बँकेचा घोटाळा हा मोठा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो, पण अनेक स्थानिक नेत्यांचे हात दगडाखाली अडकलेत. रावणाची दहा तोंडे असतात, असे पुराणात सांगितले. सेवा विकासच्या रावणात एक तोंड अमर मुलचंदानीचे आहे, बाकीची तोंडे कोणा कोणाची ते शोधा.