Desh

सेल्फी काढणाऱ्या कार्यकर्त्याला नवज्योत सिद्धूने व्यासपीठावरून ढकलले

By PCB Author

November 26, 2018

भोपाळ, दि. २६ (पीसीबी) – राजकीय सभांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना भेटण्याची इच्छा असते. त्यासाठी ते  मोठ्या उत्साहात नेत्यांच्या जवळ जाण्यासाठी धडपड करत असतात. तसेच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात. मात्र,  मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला सेल्फी काढताना धक्कादायक अनुभव आला आहे.   

माजी क्रिकेटपट्टू  आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिद्धू मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भिंड जिल्ह्यातील गोहाद मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर नागरिकांनी सिद्धूंना भेटण्यासाठी गर्दी केली. यावेळी सेल्फी घेणाऱ्या कार्यकर्त्याला सिद्धूंनी चक्क ढकलून दिल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  कार्यकर्त्याला नेत्यांकडून अशी वागणूक दिल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नेत्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्याकडून अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता या प्रकारामुळे सिद्धू अडचणीत येण्याची  शक्यता आहे. पक्षांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.