सेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद? महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरणार का ?

0
597

मुंबई,दि.१३(पीसीबी)-सत्तास्थापनेच्या दिशेने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आला आहे. काल काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत सरकारस्थापनेचा फॉर्म्युला तसेच त्याच्या अटीशर्तींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महाशिवआघाडीच्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. तर, काँग्रेसला 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते.

दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देऊनही वेळेत सरकार स्थापन करता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.