Banner News

सुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप

By PCB Author

August 16, 2018

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भारताच्या राजकारणातील कवी मनाचा अजातशत्रू व सुसंस्कृती राजकारणी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी नावाच्या महापर्वाचा अस्त झाला आहे, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच व्यक्तीद्वेष न ठेवता देशाच्या विकासासाटी सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत मार्गक्रमण केलेल्या या महामेहरूच्या निधनाचा पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी गुरूवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनीही अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

आमदार जगताप म्हणाले, “भारताच्या राजकारणातील कवी मनाचा अजातशत्रू, सुसंस्कृत राजकारणी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी नावाच्या महापर्वाचा अस्त झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला आजचे स्थान मिळवून देण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकारणात आपल्या विरोधकांशी कितीही मतभेद असले आणि विरोध असला तरी राजकारणातील सभ्यता तसेच सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. ते राजकारणातील महाऋषी होते. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. ते भारताच्या राजकीय क्षेत्रातील सभ्यतेचे महामेरू होते. राजकारणात व्यक्तीद्वेष न ठेवता देशाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत मार्गक्रमण केलेल्या या महामेरूच्या निधनाचा पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.”