सुषमा मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, शरद पवारांची भावनिक प्रतिक्रिया

0
506

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. स्वराज यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांपासून क्रीडा आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी स्वराज यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळाही दिल्या.

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असे संबोधायच्या, संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुषमा स्वराज यांच्याप्रति ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!