Maharashtra

सुर्याकडे पाहून थुंकले तर काय होणार…- अजित पवार यांचा पडळकरांना टोला

By PCB Author

June 27, 2020

सातारा, दि. २७ (पीसीबी) – सूर्याकडे पाहून थुंकलं तरी थुंकी आपल्याच अंगावर पडते हे विसरु नका. ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो कुणाबद्दल बोलतो याचा विचार न करता जो माणूस बोलतो त्याच्यावर काय बोलायचं? असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका करताना पातळी सोडली होती. त्या टीकेला आता अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार? “शरद पवार यांना उभा भारत देश ओळखतो. कुठलंही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा इतर काही समस्या. शरद पवार उमेदीच्या काळात तर फिरलेच मात्र या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो याचा जराही विचार जो माणूस करत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? सूर्याकडे पाहून थुंकल तर थुंकी आपल्याच अंगावर पडणार ना?” अशा भाषेत अजित पवार यांनी पडळकर यांना उत्तर दिलं आहे.

जी व्यक्ती बोलली त्यांचा स्वभाव तसाच आहे. पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही बोलले होते. एखाद्याला नको तितकं महत्त्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी सर्वांची डिपॉझिट जप्त केली तसं याचंही डिपॉझिट जप्त केलं. यावरुन जनाधार त्यांच्यामागे किती आहे ते समजतं, राज्याने ते ओळखलं आहे. आम्ही असल्या माणसांकडे लक्ष देत नसतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा पुतळाही जाळला. दरम्यान आज या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवारांनीही साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत कुठे अशांना महत्त्व देता म्हणत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.