सुमारे २ लाख ४० हजार कोविड लसींचे डोस असलेला एक ट्रक रस्त्याच्या कडेला बेवारसपणे आढळला

0
287

भोपाळ,दि.०१(पीसीबी) – मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील करेली बसस्थानकाजवळ शनिवारी दोन लाखांहून अधिक कोविड लसींचे डोस असलेला एक ट्रक रस्त्याच्या कडेला बेवारसपणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक कोव्हॅक्सिनच्या सुमारे २ लाख ४० हजार डोसने भरला होता. बराच वेळ ट्रक रस्त्याच्या कडेला होता, परंतु ट्रकचा चालक आणि क्लीनर बेपत्ता असल्याची माहिती कारेली पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच करेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रकची तपासणी केली असता त्यांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या सुमारे २ लाख ४० हजार लसींचे डोस आढळले. “या लसींची किंमत अंदाजे आठ कोटी रुपये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ड्रायव्हरच्या मोबाइलचा शोध घेतला तेव्हा त्याचा फोन महामार्गालगतच्या झुडपात आढळला. ट्रकची वातानुकूलित यंत्रणा चालू असल्याने डोस मात्र सुरक्षित आहेत. ट्रकचा ड्रायव्हर आणि कंडक्टर अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत.