Maharashtra

सुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले – सोनाली कुलकर्णी

By PCB Author

October 16, 2018

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मराठी रंगभूमीचे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात कलाकारांनीच दिग्गज कलाकार उभे केले आहेत. मराठी कलाविश्वात एक काळ गाजवणारे काशिनाथ घाणेकर यांच्या प्रवासात त्या काळच्या इतरही लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका होत्या. त्याच भूमिका उलगडण्यासाठी अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही वर्णी लागली आहे. रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ् अभिनेत्री सुलोचना दीदी यांची व्यक्तीरेखा सोनाली साकारत आहे. ही भूमिका साकारणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया सोनालीने दिली आहे.

सोनाली म्हणाली, ‘सुलोचनादीदींची भूमिका मिळाल्यावर बक्षिसांच्या पलीकडचा आनंद मला झाला. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की माझी भूमिका साकारण्याची वेळ कधी आली तर ती सोनालीने साकारू दे. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळे स्वप्नवत आहे. थोड्याशा काळासाठी का होईना मी ते आयुष्य जगले, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे.’

यावेळी सोनालीने सेटवरचा एक मजेदार किस्सासुद्धा सांगितला. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी जेव्हा तिने सुबोध भावेला सेटवर मेकअपमध्ये पाहिले तेव्हा ती थक्कच झाली. ‘सेटवर पहिल्या दिवशी मी चाचपडत होते. मेकअप व्यवस्थित आहे ना, पदर नीट घेतलाय ना याच विचारात होते आणि इतक्यात माझ्यासमोर सुबोध आला. मी माझ्या कोणत्याच सहकलाकाराकडे इतका वेळ कधीच पाहिले नव्हते. सुबोधकडे मी एकटक पाहतच राहिले. शेवटी मीच त्याला म्हटले की तू आधी गॉगल लाव, कारण मी फक्त तुझी मैत्रीण आहे. एवढा वेळ मी तुझ्याकडे बघतेय ती आता मलाच संकोच वाटू लागला आहे. नंतर सेटवर एकेकजण भेटत गेले आणि प्रत्येकाचा लूक पाहिला की तिच माणसं परत आली की काय असे वाटले,’ असे तिने सांगितले.