Maharashtra

सुप्रिया सुळे यांच्या कारसह ताफ्यातील सर्वच गाड्यांवर सोलापूर पोलिसांची दंडात्मक कारवाई

By PCB Author

August 25, 2019

सोलापूर, दि. २५ (पीसीबी) – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ‘संवाद ताईंशी’या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारसह त्यांच्या ताफ्यातील इतर ११ गाड्यांवर सोलापूर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे ज्या कारमधून आल्या होत्या. त्या कारसह ताफ्यातील सर्व गाड्यांवर वाहुतकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. मात्र रस्त्यालगत असलेल्या सभागृहामुळे रस्त्यावर ताफा उभा करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताफा रस्त्यावरून हलवण्याच्या सूचना केल्या. मात्र त्यानंतरही ताफा न हलल्याने ताफ्यातील एकूण ११ वाहनांवर प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात आला.