सुप्रिया सुळे यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी नको; स्थानिक नेत्यांचा विरोध

0
1055

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान चार खासदारांपैकी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे वगळता अन्य तिघां खासदारांना पुन्हा संधी देण्यास  स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि साताऱ्याचे खासदार उद्यनराजे भोसले यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, असे स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सांगितले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पक्ष मुख्यालयात  शनिवारी आणि रविवारी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली. यावेळी पक्षाची ताकद असलेले मतदारसंघ, तेथील राजकीय परिस्थिती, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते  शरद पवार यांनी जाणून घेतली.

दरम्यान, संभाव्य उमेदवार कोण असतील, याचीही चाचपणी करण्यात आली. अद्याप ही चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणत्या जागा लढवणार हा महत्त्वाचा विषय नाही, असे सांगून काही जागांवर मित्रपक्षासोबत अदलाबदलीचे संकेत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले. यावेळी यवतमाळ, पुणे, हातकणंगले अशा राष्ट्रवादीकडे नसलेल्या मतदारसंघांचाही आढावा  या बैठकीत घेण्यात आला.