सुप्रिया सुळेंकडून केंद्रावर ताशेरे: ‘केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांचा…’

0
212

मुंबई, दि.११ (पीसीबी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केलं आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हे मुघलांचं राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणं ही यांची संस्कृती नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकात आल्या होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घाणाघाती टीका केली. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी त्यांनी बंदच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारव टीका केली. लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे. माणुसकी राहिली नाही. पूर्वी राजकारणात माणुसकी होती. केंद्राने ही माणुसकी संपवली आहे. शेतकऱ्यांचा खून केला आहे. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे. ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा. यात माणुसकी दिसते. ही क्रूरता आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे, असं सांगतानाच नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. कामगार संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. बंदही यशस्वी झाला आहे. बंदला काही भाजपच्या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, त्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत. त्यांचा विरोध आहे. मोठ्या संघटनांचा बंदला पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे. बंद पुकारल्यानंतर लोक स्वत: समोर येऊन पाठिंबा देत आहेत. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. देशातील शेतकरी बंदकडे पाहत आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना 400 पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरयाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. बंद सुरू आहे. बंद शंभर टक्के यशस्वी आहे, असं राऊत म्हणाले.

बंद दरम्यान बसेस फुटतील. पण कोणत्या बसेस फुटल्या माहीत नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे, असं सांगतानाच तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने बंद होण्याने उतरले आहेत. लोक बंदमध्ये उत्सफूर्तपणे उतरले आहेत. बंदमध्ये ज्या काही किरकोळ घटना घडतात त्या जगभरात होत असतात, असंही राऊत म्हणाले.