Pimpri

सुपरवायझरची कंपनी मालकाला आत्महत्येची धमकी

By PCB Author

October 01, 2020

बोपखेल, दि. १ (पीसीबी) – सुरक्षा रक्षकांच्या पगारातून पैसे कापून घेतल्याची चौकशी सुरु असलेल्या सुपरवायझरने कंपनी मालकाला आपण आत्महत्या करत असल्याची धमकी दिली. त्याचा व्हिडीओ आणि लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो कंपनीमालकाच्या फोनवर पाठवला. याबाबत सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे साडेबारा वाजता घडली. वैभव रंगनाथ साठे (वय 32, रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी इंद्रजीत महावीर चौगुले (वय 38, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव साठे हा फिर्यादी यांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीत काम करणा-या सुरक्षा रक्षकांच्या पगाराचे पैसे फिर्यादी यांनी दिले होते. सुरक्षा रक्षकांच्या पगारातील काही पैसे आरोपी साठे याने स्वताकडे ठेऊन घेतले. याबाबत सुरक्षा रक्षकांनी चौगुले यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची रीतसर चौकशी सुरु आहे. दरम्यान बुधवारी पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास साठे याने चौगुले आणि अन्य काही जणांना व्हाटस अपवर ‘आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ आणि आत्महत्याबाबत लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो काढून पाठवला.