सुधारणा करा, अन्यथा आमच्याकडे पर्याय तयार आहेत; निवडकर्त्त्यांचा खेळाडूंना इशारा

0
460

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – सलग संधी देऊनही चांगली कामगिरी न झाल्यास दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल, असा स्पष्ट इशारा भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी दिला आहे. इंग्लंडविरूद्ध पाच  सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-४ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निवडकर्त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना हे मत मांडले. भारतीय गोलंदाज इंग्लंडमधील आपल्या चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियातही करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, मात्र परिणाम वेगळाच होता, असे ते म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता कसोटीतील प्रमुख फलंदाजांना सरावासाठी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न असेल, असे एमएसके प्रसाद म्हणाले. त्यामुळे प्रमुख फलंदाजांना सरावासाठी ऑस्ट्रेलियात अगोदरच पाठवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही खेळाडूला भारतीय संघात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पूर्ण संधी दिली जाते. स्वत:ला सिद्ध न करू शकल्यास युवा खेळाडूंकडे पाहिले जाते, असे एमएसके प्रसाद यांनी सांगितले.