सुतार जात असताना बलाई जातीचा दाखला शिवसेना आमदारा विरोधात उच्च न्यायालयात याचिका

0
533

बुलडाणा, दि. १६ (पीसीबी) – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोची समाजाचा खोटा जात दाखला देत अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र मिळविले आणि खासदारकी मिळविली. त्यांनी ज्यांचा पराभव केला त्या शिवेसेना उमेदवार आनंद आडसुळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने नुकताच त्याबाबत निकाल देत नवनीत राणा यांचा जात दाखला खोटा ठरविला आणि त्यांनी दोन लाख रुपये दंड केल्याने आता राणा यांची खासदारकीसुध्दा धोक्यात आली आहे. आता तसाच दुसरा एक प्रकार शिवेसना आमदाराचा असून त्यांनी सुतार जात असताना वलाई या मागास जातीचा दाखला देत आमदारकी मिळविल्याचे समोर आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये लाच देऊन बलाई-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविले, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.

दौलत मानकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. समितीमधील सदस्य आय.एस. किटकारे, व्ही.एस. शिंदे व एम.जी. वाठ हे रायमुलकर यांच्या मर्जीतील आहेत. त्यांनी एकूण दीड कोटी रुपये घेऊन १० आक्टोबर २०१७ रोजी रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र दिले. परंतु, रायमुलकर हे सुतार जातीचे असून ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. रायमुलकर यांच्या शालेय कागदपत्रांवर सुतार जातीचा उल्लेख आहे. तसेच, त्यांचे पणजोबा, आजोबा व भावाच्या कागदपत्रांवरदेखील सुतार जातीचाच उल्लेख आहे. केवळ तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्डमध्ये बलई जातीचा उल्लेख असून ती नोंद दुसऱ्या शाईने केल्याचे तपासणीनंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळे रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा व समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, अशा प्रकारे खोटे जात दाखले देऊन खासदार, आमदार झालेल्या लोकप्रतिनिधींबद्दल आता लोकांच्या मनात तीव्र संताप असल्याचे सांगण्यात आले. अशा लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून पुढे आली आहे.