सुजय विखेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी खासदार दिलीप गांधींची दिल्लीत फिल्डींग  

0
762

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) –  अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून आघाडीमध्ये  मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोंडी झालेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे  पूत्र डॉ. सुजय विखे हे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी खासदार दिलीप गांधी   दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाजन यांनी तातडीने नगरमध्ये येऊन विखेंचे लोकसभेचे तिकीट निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. सुजय विखे यांनी  लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी  केली आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडून तिकीटाचे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, असे साकडे कर्जत-जामखेड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना घातले आहे.  तर खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत दाखल झाले असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.  खासदार गांधी यांनी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन सुजय यांचा भाजपप्रवेश रोखण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.