सीरम इन्स्टिट्यूट मध्ये व्हॅक्सिन उत्पादनालाही सुरुवात

0
311

लंडन, दि. 17 (पीसीबी) : कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या अवघ्या जगाचे डोळे कोरोवरील लस कधी येतेय याचीच आतूर होऊन, वाट पाहत आहेत. अनेक देश कोरोना व्हॅक्सीन बनविण्याच्या स्पर्धेमध्ये आहेत. अशावेळी ब्रिटनमधून एक पॉझिटिव्ह बातमी आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये चाललेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचे पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सप्टेंबरमध्ये ही लस जगभरात उपलब्ध होणार आहे.

ब्रिटनचे वृत्तपत्र द टेलीग्राफने याबाबत वृत्त दिले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरु आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.

या टप्प्यात ही लस कोरोनाग्रस्तांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनविण्यात यशस्वी ठरली आहे. टेलिग्राफने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल आले आहेत. ब्रिटनमध्ये काही रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली. यानंतर काही दिवसांतच या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनल्या आहेत.

मात्र, यावर जेनर इन्स्टिट्यूटने यावर स्पष्टीकरण दिले नसून त्यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत 20 जुलैला रिसर्च पेपर लांसेट जर्नलमध्ये छापण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच यानंतर याबाबत अधिकृत बोलणार असल्याचे जेनर इन्स्टिट्यूटने सांगितले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एप्रिलमध्येच कोरोनाच्या लसीची चाचणी सुरु केली होती. तेव्हा 500 कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. कोरोनावरील लसीबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी म्हटले होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे.

पुण्यात बनणार…
अ‍ॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अ‍ॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे. या कोरोना लसीचे 1 अब्ज व्हायल्स बनविण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरविली जाणार आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन 2020 च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एप्रिलमध्येच सीरम इन्स्टिट्युटने याची घोषणा केली होती. यासाठी आपण मोठी रिस्क घेत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते. सीरम ही ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते. यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.