सीमाताई कोठूनही निवडणूक लढतील आणि जिंकतील; गिरीश बापटांचा विश्वास

0
1092

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये चांगले काम आहे. त्या लढवय्या आहेत. त्या कोठूनही निवडणूक लढवू शकतात आणि जिंकूही शकतात, अशा शब्दांत कौतुक करून त्यांच्या पाठिशी सदैव उभा राहील, अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आज (सोमवार) येथे दिली.

पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानिमित्त व पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदारपदी निवड झाल्याबद्द्ल पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बापट बोलत होते.

याप्रसंगी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व  आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार योगेश टिळेकर, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,  महापौर राहुल जाधव,  माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे, उमा खापरे, शैला मोळक, आदी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बापट यांनी आपल्या पंधरा मिनिटांच्या भाषणात ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचा विशेष नामोल्लेख करून त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. बापट पुढे म्हणाले की, आमच्या सीमाताई बघता-बघता अमरावतीला गेल्या. तिथे त्यांनी वलय निर्माण करून निवडणूक लढवण्याची तयारी केली.  सीमाताई   अमरावती येथून लोकसभा निवडणूक लढविण्यास  इच्छुक होत्या. याबाबत त्यांनी मला फोनही केला होता. मात्र, त्यांना संधी मिळू शकली नाही. पण त्यांनी कोठूनही निवडणूक लढवण्याची तयारी करावी, त्या लढवय्या आहेत, असे बापट म्हणाले.