Desh

सीबीआय मुख्यालयात छापा, इमारत सील; कार्यालयाची झाडाझडती सुरू

By PCB Author

October 24, 2018

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागात (सीबीआय) सध्या उच्चपदस्थांमध्ये संघर्ष सुरू असून रात्री मुख्यालयात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली असून कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाऊ दिले जात नाही आहे. अधिकाऱ्यांची एक टीम इमारतीत उपस्थित असून  सर्व कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे.

दरम्यान केंद्र सरकारने कडक पाऊले उचलत सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासंबंधी आदेश जारी करत तात्काळ स्वरूपात आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे.

नागेश्वर राव यांच्या नेतृत्वात सध्या छापा टाकण्यात आला असून आलोक वर्मा यांच्या ११ व्या मजल्यावरील कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात दाखल एफआयरचा तपास करणारी टीम बदलण्यात आली असून डीआयजी मनोज सिन्हा यांनादेखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.