सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला दाखल

0
230

हाथरस, दि. १८ (पीसीबी)- उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात महत्वाची घडामोड समोर आली आहे. सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तीन महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हाथरसमद्ये १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होतं.
रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलीस मात्र कुटुंबाच्या इच्छेनुसारच सर्व काही करण्यात आल्याचा दावा केला होता. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता.

मुख्य आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांना जेलमधून पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्याने आपण आणि आपल्या मित्रांना या प्रकरणात अडकवलं जात असून न्याय देण्याची मागणी केली होती. पीडितेची आई आणि भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा दावाही त्याने केला होता. पीडितेच्या कुटुंबाने हे आरोप फेटाळले होते.
दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.