Desh

सीआरपीएफचे जवान नसते, तर मी कोलकात्यातून जिवंत आलो नसतो – अमित शहा

By PCB Author

May 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – कोलकाता येथील रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचारावेळी सीआरपीएफचे जवान नसते, तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो, मी तिथून सुखरुप निघू शकलो, हे माझे नशीबच आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

या रोड शोदरम्यान  तीन वेळा हल्ला झाला, तिसऱ्या हल्ल्यात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आणि रॉकेल भरलेल्या बॉटलही फेकण्यात आल्या, असा गंभीर आरोपही शहा यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत  केला.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल वगळता अन्य कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही.  मी ममताजींना चांगले ओळखतो.  पश्चिम बंगालमधील हिंसाचारामागे फक्त तृणमूल काँग्रेसचा हात  आहे, असे  शहा म्हणाले. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा फोटो फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

आमच्या कार्यकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. आम्ही ममता दीदींच्या धमकीला भीक घालत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.