Maharashtra

सिनेअभिनेता एजाज खान याला अमली पदार्थांच्या गोळ्यांसह अटक

By PCB Author

October 24, 2018

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – अमली पदार्थाच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी सिनेअभिनेता एजाज खान याला नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने बेलापूर सेक्टर ११ येथील हॉटेल के. स्टारमधून मंगळवारी (दि.२३) अटक केली. याबाबत सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी एजाजकडून एस्न्यॅटसी या अमली पदार्थाच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

एजाजकडे दहा नशेच्या गोळ्या मिळाल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त तुषार दोषी यांनी दिली. एजाज हा दोन दिवसांपासून हॉटेल के. स्टारमध्ये थांबला होता. सीबीडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये तो एस्न्यॅटसी या अमली पदार्थाच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांना मिळाली होती. यावर पोलीसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी २.३० ग्रॅम वजनाचा एस्न्यॅटसी या अमली पदार्थाच्या गोळ्या आढळल्या. त्याची किंमत २ लाख २० हजार रुपये भरते. त्या जप्त करण्यात आल्या  आहेत.  दुपारी एजाज याला न्यायालयात हजर केले असता त्याला गुरुवार (दि.२५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.