सिग्नल बंद करून दौंड येथे कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा; चोरांना पकडण्यासाठी गेलेली व्यक्ती जखमी

0
261

दौंड, दि.२७ (पीसीबी) : मुंबईवरून – भुवणेश्वरच्या दिशेने जात असलेल्या कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. दौंड जवळील नानाविज फाटा येथे सिग्नल बंद करून गाडीवर दरोडा टाकला गेला. या दरोड्यात तीन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र असा तब्बल दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. दरम्यान याप्रकरणी मिनिक्षा शिवपुष्पा गायकवाड (रा. सोलापूर) यांनी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड लोहमार्ग पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मुंबईवरून – भुवणेश्वरच्या दिशेने कोणार्क एक्सप्रेस मंगळवारी दौंड रेल्वे स्थानकाच्या दिशेनी चालली असताना त्यावेळी दौंड हद्दीतील नानाविज फाटा येथे अज्ञात तीन चोरट्यांनी एक्स्प्रेस येणाच्या अगोदर चोरट्यांनी सिग्नलची वायर कट करून सिग्नल बंद केला होता. त्यामुळे कोणार्क एक्सप्रेस रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नानाविज फाटा या ठिकाणी थांबली असता, अज्ञात तीन चोरट्यांनी दोन प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र खेचले. व अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणावरून पसार झाले. कोणार्क एक्सप्रेसमधील दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरी झाल्याने त्यांनी आरडा ओरडा केला. हा प्रकार समजतात गाडीतील एक पुरुष तीन चोरांच्या पाठीमागे धावू लागला. तेव्हा चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत तो व्यक्ती जखमी झाला आहे. याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे हे करीत आहेत”, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.