सिगारेटचे पैसे मागितल्याने ‘आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ म्हणत एकावर कोयत्याने वार

0
415

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – टपरी मधून 200 रुपयांच्या गायछाप तंबाखू व सिगारेट खरेदी केल्या. त्याचे पैसे टपरी चालकाने मागितले असता तिघांनी मिळून टपरी चालकाला ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर टपरी चालकावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोन वाजता कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागे घडली.

तुषार संतोष धेंडे (वय 18, रा. कासारवाडी) असे जखमी टपरी चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुक्तार तांबोळी (वय 23), आतिष उर्फ बंटी गावडे (वय 22), बसुराज यमनाप्पा धोतरे (वय 20, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुक्तार तांबोळी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आतेभावाची कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे पान टपरी आहे. आरोपींनी टपरीमधून 200 रुपयांच्या गायछाप तंबाखू आणि ब्रिस्टॉल सिगारेट खरेदी केल्या. फिर्यादी यांनी आरोपींना पैसे मागितले असता आरोपींनी ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला.

‘मी गरीब आहे. माझे पैसे देऊन टाका’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपी आतिष याने गचांडी पकडून फिर्यादी यांना टपरीच्या बाहेर ओढले. आरोपी मुक्तार आणि बसुराज या दोघांनी हाताने मारहाण केली. मुक्तार आणि आणि आतिष यांनी कमरेचा कोयता काढून फिर्यादी यांच्या हातावर वार करून जखमी केले.

दरम्यान फिर्यादी यांनी रस्त्याने येणा-या-जाणा-या लोकांकडे मदत मागितली असता आरोपींनी ‘तुझ्या मदतीला कोण येते तेच पाहतो. असे म्हणत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. आरोपींनी टपरी मधून 400 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. फिर्यादी यांनी आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढला असता आरोपी बासुराज याने दगड व विटांनी मारून फिर्यादी यांना दुखापत केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.