Pune

सिंहगड किल्ला पुढील चार दिवस पर्यटकांसाठी बंद

By PCB Author

July 09, 2018

पुणे, दि. ९ (पीसीबी) – सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पुढील चार दिवस बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दरड हटवण्यात अडचणी येत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. सिंहगड घाट सुरु होण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे, असेही प्रशासनाने सांगितले आहे. ‘पाऊस असल्याने या रस्त्यावर आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सिंहगडावर जाणं टाळून सहकार्य करावे,’ असे आवाहन हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले आहे. यामुळे पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याचं सौंदर्य अनुभवायची इच्छा असणाऱ्या पर्यटकांना आता काही दिवस वाट पाहावी लागेल. दरम्यान, सिंहगड घाटात काल पहाटे दरड कोसळली. सुदैवाने पहाटेच्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली.