सिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार  

0
1535

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी येत्या १९ आणि २० डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.  यावेळी राष्ट्रवादीकडून सिंधुदुर्गची जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा सोडण्यास काँग्रेस ठाम विरोध करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.   

सिंधुदुर्गच्या जागेवर  राष्ट्रवादीने दावा केला आहे. येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिंरजीव माजी खासदार निलेश राणे  राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार  असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र,  जागावाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.त्यामुळे राष्ट्रवादीकडून ही जागा राणेंना सोडण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी राणेंच्या निवासस्थानी दिलेल्या  भेटीत याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचा राणे यांना महाआघाडीत घेण्यास विरोध असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  यांनी आधीच म्हटले आहे. त्याचबरोबर चव्हाण आणि नारायण राणे यांचे विळ्या भोपळ्याचे वैर लक्षात घेता राणेंना सिंधुदुर्गची जागा सोडण्यास चव्हाण अजिबात तयार होणार नाहीत, असे बोलले जात आहे.