सिंचन प्रकल्पावरून मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांमध्ये वाक्‌युध्द      

0
819

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील शेतकरी मेळाव्यात केले होते. या विधानावर  उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  बंद पडलेल्या सिंचन योजना शेवटी- शेवटी कशाला सुरु करायच्या? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

शेतकरी मेळाव्यात बोलताना  मुख्यमंत्री म्हणाले की, युती सरकारने सुरू केलेल्या परंतु आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या.  तर अजित पवार म्हणाले की, बंद पडलेल्या सिंचन योजना सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या?

अजित पवार पुढे म्हणाले की, सिंचन योजना बंद पडलेल्या होत्या तर शेवटी शेवटी कशाला सुरु करायच्या? या बंद पडलेल्या योजना सरकारला पूर्ण करायच्या होत्या, तर ४ वर्षांपूर्वी सरकारमध्ये आले होते, तेव्हा का नाही केल्या? सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या आहेत? केंद्रामध्ये नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत, राज्य सरकार या लोकांच्या ताब्यात आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहून भाजपच्या नेत्यांना काय घोषणा करावी आणि काय नको, असे वाटू लागले आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना आपलेसे करण्याचा भाजप सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.