Maharashtra

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना वाचविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

By PCB Author

September 17, 2019

नागपूर, दि. १७ (पीसीबी) – नागपूर विभागातील सिंचन घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे राज्य सरकार केवळ  राजकारणासाठी सिंचन घोटाळ्याचा वापर करत आहे, असा आरोप याचिकाकर्ते आणि जनमंच संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे.

नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द प्रकल्पातील तब्बल १५५ टेंडरची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात २०  एफआयआर दाखल झाले  आहेत. तर ५ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. यात अजित पवारांचा या घोटाळ्याशी काही संबंध आहे की नाही, याबाबत सरकारने काहीही उत्तर दिलेले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग  असल्याचे    म्हटले होते. हे प्रकऱण न्यायालयात आहे, असे सांगितले होते. मात्र,  सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचे नांव  नाही, त्यामुळे सरकार अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल उपस्थित  केला जात आहे.