साहेब, शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला; स्थायीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत आर्थिक व्यवहार?

0
707

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष निवडीवरून भाजपसोबत शिवसेनेतही राजकीय वातावरण तापले आहे. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. हा अर्ज भरताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे स्वतः जातीने हजर होते. त्यामुळे शहरातील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेल्याचे चित्र आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे आपल्या प्रत्येक भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जहरी टिका करतात. त्याच शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडमधील गटनेते कलाटे हे मात्र अजितदादांना पूर्ण शरण गेल्याचे पाहायला मिळत आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदावरून भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. त्याचा फायदा होईल, या आशेने राष्ट्रवादीने स्थायीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला आहे. स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे सदस्य मोरेश्वर भोंडवे यांनी स्थायी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. त्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळेच भोंडवे हे अर्ज भरताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे स्वतः जातीने उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. उर्वरित अकरा सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला आपल्याकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी किंमत मोजल्याचे बोलले जात आहे. स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

तसेच भाजपचे सदस्य फोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने घोडेबाजार सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यातून राजकीय चमत्कार होईल, अशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आशा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन भोंडवे यांचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेतील या चुंबाचुंबीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेतील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादी आणि शिवेसना विरोधी पक्ष बनले. परंतु, गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात शिवसेनेला महापालिकेतील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविता आलेले नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावूनच विरोधकाची भूमिका बजावणे पसंत केले आहे.

यापूर्वीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत दबदबा होता. त्यांनी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले होते. त्यामुळे शिवसेनेच्या डरकाळीने सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फुटायचा. आता मात्र शिवसेनेचा वाघ पळून गेल्याचे आणि राष्ट्रवादीने पाळलेल्या शेळ्या पक्षाचा गाडा कसाबसा हाकत असल्याचे राजकीय चित्र आहे. आताची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेल्यामुळे कट्टर शिवसैनिक मात्र संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने संयुक्त पत्रकार परिषद घेणे तसेच स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संयुक्त उमेदवार देण्याच्या राजकीय घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मेहेरबानीवर शिवसेना चालणार असेल, तर नको आम्हाला हा पक्ष, अशी संतप्त भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पक्षाचे शहरप्रमुख म्हणून कलाटे पूर्णतः अपयशी ठरले. त्यांनी शिवसेनेला रसातळाला नेले. पक्षवाढीऐवजी स्वतःची राजकीय वाढ करून घेण्यातच धन्यता मानली. पक्षाच्या नगरसेवकांची संख्या घटली. आता पक्षाचा गटनेता म्हणून काम करताना कलाटे यांनी आपले मूळ गुण दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी शिवसेनेला संपविण्याचाच विडा उचलला आहे, असा संताप शिवसैनिक व्यक्त करत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे आपल्या जाहीर भाषणांमधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जहरी टिका करतात. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे पदाधिकारी अजितदादांना शरण गेल्याचे पाहायला मिळत आहे.

जो पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेला, त्याचे अस्तित्व संपल्याचा शहराचा राजकीय इतिहास आहे. १४-१५ नगरसेवक निवडून येऊनही काँग्रेसने नेहमी राष्ट्रवादीच्या ओंजळीनेच पाणी पिणे पसंत केले.  अजितदादांनी टाकलेल्या एक-दोन पदांच्या तुकड्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नेहमी समाधान मानले. आज त्याच काँग्रेसचा शहरात एकही नगरसेवक नाही. राष्ट्रवादीच्या संगतीने काँग्रेसचे शहरातील अस्तित्व पुसले गेले. आता शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत संगत धरली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची सुद्धा काँग्रेससारखीच अवस्था झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.