Maharashtra

‘साहेब लवकर या’! शिवसैनिकांचा छगन भुजबळांना आग्रह

By PCB Author

September 03, 2019

नाशिक, दि. ३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या बैठका, शिवस्वराज यात्रा आणि सभांकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली असल्याने ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. यावर खुद्द शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते.

मंगळवारी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना भेटून स्थानिक शिवसैनिकांनी आपण शिवसेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा, असा आग्रह करत साकड घातले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचे वादळ सुरू आहे. मी येथेच असल्याचे वक्तव्य करत शिवसेनेत जाणार नसल्याचं ठामपणे स्पष्टीकरण न दिल्याने भुजबळ हे शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, असा प्रश्न सध्या कार्यकर्त्यांना पडलाय. सर्व पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी विविध विकासकामांच्या उद्घाटन लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले असल्याचे सांगत, भुजबळांनी यावर जास्त बोलण टाळले. यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार हा सर्वांनाच प्रश्न पडलाय.