साहेब, आता तरी ‘इंजिन’ चालवा! मनसैनिकांचे आर्जव

0
532

पुणे, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पक्ष टिकवायचा असेल, तर निवडणूक लढलीच पाहिजे, अशी कळकळ कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या कानी घातली आहे. मात्र, ठाकरे यांची ‘मन की बात’ अजूनही न समजल्याने आगामी निवडणूक लढायची की नाही, याबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून राज्यभर घेतलेल्या झंझावाती सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षांच्या तुलनेत मनसेने नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला होता. राज यांच्या सभा वगळता कार्यकर्त्यांना कोणतेही काम नसल्याने त्यांना शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता दरम्यानच्या काळात आलेली मरगळ झटकून कार्यकर्ते पक्षाचे ‘नवनिर्माण’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘पक्ष जिवंत ठेवायचा असेल, कार्यकर्ते टिकवायचे असतील, तर निवडणूक लढवावीच लागेल. निकाल काहीही लागला तरी लढणे महत्त्वाचे आहे. पुण्यातील सर्व मतदारसंघात आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, ही भावना साहेबांच्या कानावर घातली आहे,’ अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्याने दिली. पुण्यातील सर्व मतदारसंघात आपल्याकडे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. मनसेची ताकद असलेल्या प्रामुख्याने कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा या चार मतदारसंघात जोरदार लढा देण्याचे पक्षाचे नियोजन आहे. पर्वती, वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंटमधूनही चाचपणी केली जात असली, तरी या जागांबाबत पक्ष साशंक आहे. कोथरूडमधून किशोर शिंदे, सुधीर धावडे, राम बोरकर यांची नावे चर्चेत आहेत. कसबा मतदारसंघातून रूपाली पाटील, आशिष देवधर, शिवाजीनगरमधून रणजित शिरोळे, सुहास निम्हण, पर्वतीतून विक्रांत अमराळे, राहुल गवळी, जयराज लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. वडगाव शेरी येथून कल्पेश यादव, सुनील कदम, हेमंत बत्ते यांची चर्चा आहे. हडपसरमधून वसंत मोरे, खडकवासल्यातून वसंत मोरे, चंद्रकांत गोगावले, सचिन पांगारे आदी इच्छुक आहेत. कोथरूडमध्ये चित्रपट अभिनेते रमेश परदेशी यांच्यासह आणखी एक ‘सरप्राइज’ नाव समोर येण्याचीही शक्यता आहे.