सासरच्यांना समजावण्यासाठी आलेल्या माहेरच्या लोकांना मारहाण; पुन्हा आल्यास बघून घेण्याची धमकी

0
343

वाकड, दि. २५ (पीसीबी) – घरगुती कारणांवरून होत असलेल्या वादामुळे माहेरची मंडळी सासरच्या लोकांना समजावण्यासाठी आली. त्यावेळी सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांना मारहाण केली. तसेच पुन्हा याठिकाणी आला तर तुझ्याकडे बघून घेतो, असा दम दिला. ही घटना सोमवारी (दि. 24) सकाळी साडेअकरा वाजता सदगुरु कॉलनी गुरुनानक नगर, थेरगाव येथे घडली.

दस्तगीर शिराजुद्दीन शेख (वय 48, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ताफ शेख, अजमुद्दीन शेख, नजिरा शेख, काजल सय्यद (सर्व रा. सदगुरु कॉलनी, गुरुनानक नगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मुलीच्या सासरी सासरच्या लोकांना समजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी जावई अल्ताफ शेख याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. सासू, नणंद यांनी सर्वांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पुन्हा या ठिकाणी आला तर तुमच्याकडे बघून घेतो असा दम दिला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.