सासरकडच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0
431

केज, दि.२० (पीसीबी) – सासरकडच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील डोका येथे शनिवारी (दि.१८) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सूरज रामराव भांगे (पती), कांचन रामराव भांगे (सासू), रामराव शामराव भांगे (सासरा), विलास मुरलीधर भांगे (चुलत दीर), रुख्मिन विलास भांगे (चुलत सासू), किरण विलास भांगे (चुलत पुतण्या) असे या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी काशीनाथ फुलचंद केदार यांनी शीतल यांचा विवाह रामराव भांगे यांचा मुलगा सूरज याच्यासोबत दोन लाख रुपये हुंडा देऊन रीतिरिवाजाप्रमाणे विवाह करून दिला होता. मात्र ठरल्याप्रमाणे दागिन्यांसाठी एक लाख रुपये देण्याचे बाकी राहिले होते. त्यामुळे शीतल हिला माहेरहून दागिन्यांचे राहिलेले एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी  पती आणि सासरकडच्यांनी दिवाळीच्या सणाच्या दोन दिवसांपूर्वी शितलला उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले. दिवाळीच्या सणात माहेरी असलेल्या शितलने मी त्यांच्या त्रासाला वैतागून गेले आहे, मला नांदायला पाठवू नका अशी विनंती केली होती. परंतु माहेरच्या लोकांनी पुन्हा सासरी जाऊन त्यांची समजूत काढून शितलला नांदायला पाठवले. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा राहिलेल्या एक लाख रुपयांची मागणी करून शितलला मारहाण करून पुन्हा हाकलून दिले. तेव्हांपासून शीतल १७ जानेवारीपर्यंत माहेरी शिरपुरा येथे होती. १८ जानेवारी रोजी सासरचे लोक शितलच्या माहेरी आले. त्यांनी शितलला आता कसलाच त्रास देणार नाहीत, तिला नांदायला पाठवा असा त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे काशीनाथ केदार यांनी शितलला सासरी पाठवून दिले. माहेरी जाऊन चार तासांचा अवधी लोटत नाही, तोच शितल हिने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या सासरी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. रविवारी सकाळी काशीनाथ केदार यांच्या तक्रारीवरून सासरकडच्यांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले व पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.