सावरकरांच्या ‘भारतरत्न’साठी विरोध करणाऱ्यांना, सावरकरांच्याच कोठडीत दोन दिवस ठेवा – संजय राऊत

0
420

मुंबई,दि.१८(पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केल्यानंतर यावर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जे सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करत आहेत, ते कुणीही असो त्यांना अंदमान तुरुंगातील सावरकरांच्याच कोठडीत दोन दिवस ठेवावे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी काय केलं होतं हे आम्हाला कुणी सांगू नये. पृथ्वाराज चव्हाण काँग्रेसचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, भारतरत्न देण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाकडून घेण्यात येतो. सावरकरांचा सन्मान व्हावा ही आमची नेहमीच मागणी राहिली आहे. जर कुणी विरोध करत असेल, तर ती त्यांची भूमिका असेल. अशी भूमिका असू शकते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांना सावरकरांनी केलेल्या मोठ्या त्यागाबद्दल आणि संघर्षाबद्दल कल्पना आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा राजकीय प्रयोग करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका विरोधाभासी येत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरही असाच संघर्ष पाहायला मिळत आहे.