सावधान; कमी झोपेमुळे आरोग्यावर धोका

0
655

मुंबई, दि.३० (पीसीबी) – रात्रीची झोप ही आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. अनेकदा डॉक्टर्सही कमीतकमी सात ते आठ तास रात्रीची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. पण जर तुम्ही रात्रीची सात ते आठ तास झोप घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जे लोक रात्री सात तासांपेक्षा कमी झोप घेतात त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर होत असतो. एका संशोधनादरम्यान ही माहिती समोर आली आहे. जे लोक सात तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना हृदय रोग किंवा कोरोनरी हृदय रोग होण्याची जास्त शक्यता असते. एक्सपरिमेंटल फिजिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार रात्री सात तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांच्या शरीरात मायक्रोआरएनएचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.

 

दरम्यान, कमी झोपेमुळे हृदयाचे आरोग्य आणि संपूर्ण शरीरशास्त्र प्रभावित होत असते, असे अमेरिकेतील कोलोराडो विद्यापीठातील प्राध्यापक ख्रिस्तोफर डिसोझा यांनी सांगितले. या संशोधनात ४४ वर्षांपासून ६३ वर्षांपर्यंतच्या लोकांच्या रक्ताचे नमूने गोळा करण्यात आले. यामध्ये स्त्री आणि पुरूष दोघांचाही समावेश करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडून झोपेसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही भरून घेण्यात आली.

 

काही लोकांनी आपण सात ते साडेआठ तास, तर काही लोकांनी आपण रात्री पाच ते पावणे सात तास झोप घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनंतर त्यांचे मायक्रोआरएनएची तपासणी करण्यात आली. यामध्ये कमी झोप घेणाऱ्यांमध्ये एमआयआर१२५ , एमआयआर१२६ आणि एमआयआर१४ एचे प्रमाण पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आले.